Saturday, March 23, 2013

पुस्तकानुभव - मुसाफिर

एखाया माणसाचे अनुभव विश्व किती समृद्ध असावे  याला काही प्रमाणात तरी सीमा असते..माणसाची बौद्धीक पातळी, त्याची आवड निवड, विविध विषयामध्ये रस घेण्याची त्याची आवड, विविध विषय आत्मसात करण्याची त्याची कुवत, ते आत्मसात करण्यासाठी अफाट कष्ट घेण्याची तयारी,  समाजकारण समजण्याची आणि त्यात स्वताला झोकून देण्याचे धैर्य वगैरे अनेक गोष्टी माणसाचे अनुभव विश्व समृद्ध करत असतात असे मला वाटते. पण अच्च्युत गोडबोले यांनी या साऱ्या सीमा पार केलेल्या दिसतात...मुसाफिर हि त्यांची आत्मकहाणी...

हे पुस्तक वाचेपर्यंत गोडबोले हे एक कॉम्पुटर विषयातील तज्ञ एवढीच माझी त्यांची ओळख होती...मी २००० सालामध्ये बांद्र्यामध्ये C-DAC चे प्रशिक्षण घेत असताना गोडबोले सर आम्हाला operating system या विषयावर व्याख्यान द्यायला आले होते.   अजून सुद्धा त्यांची सुटाबुटातली ती प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. खरे तर त्यावेळेला त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाने मला भारावून टाकले होते. त्यांचा विषय सोपा करून सांगण्यातला हातखंडा आणि कुठेही आपण L&T सारख्या मोठ्या कंपनीचे CEO असल्याचा कुठेहि बडेजाव नसणे हि त्यामागची करणे असावीत. पण त्याच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू असतील याची पुसटशी सुद्धा कल्पना मला आली नव्हती.

या आधी मी अच्चुत गोडबोले आणि अतुल कहाते यांचे स्टीव जॉब्स वरील पुस्तक वाचले होते. त्यामुळे गोडबोले यांची लेखनशैलीची थोडी का होइना पण ओळख होती असे म्हणायला हरकत नाही. पण "मुसाफिर" हा माझ्यासाठी एक नवीन, अदभूत आणि मनाला चटका लावणारा ठरला.

गोडबोले यांचे हे आत्मचरित्र म्हणजे एक अत्यंत प्रामाणिक पणे कथन केलेली चकित करून टाकणारी कहाणी आहे. त्यांचे सोलापूर मध्ये गेलेले बालपण, आय आय टी सारख्या उच्च संस्थेमधील त्यांचे शिक्षण, आय आय टी मधील इग्रजी शिकण्यासाठीची त्यांची धडपड, संगीताची त्यांची आवड, समाजकारणाचा त्यांनी घेतालाला ध्यास व त्यासाठी झालेला तुरुंगवास अत्यंत प्रभावीपणे आपल्या समोर येतात. कुठल्याही विषयाचे मूळ गाठून तो पूर्णपणे आत्मसात केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अवघड आहे ते सोपे करावे, सोपे आहे ते सहज करावे आणि ते सर्व जनाला सांगावे असे तत्व त्यांनी आयुष्यभर अवलंबलेले दिसते.

धुळ्याजवळ शहादा येथील आदिवासी भागात काम केल्यानंतर परत मुंबई ला आल्यावर त्यांची झालेली ससेहोलपट, मुंबईच्या वेश्या वस्ती आणि झोपडपट्टी मधील त्यांचे अनुभव सर्व काही सुन्न करणारे आहे. त्यांचा कॉम्पुटर क्षेत्रामधील प्रवेश, तिथली वैफाल्यग्रस्तता, त्यातून निर्माण झालेली व्यसनाधीनता, मुलाला झालेला असाध्य आजार, व्यसनाधीनते मधून बाहेर येण्याची धडपड, मुलासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने घेतलेले अपार कष्ट, कॉम्पुटर तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वाहून घेतलेली धडपड वाचून उर भरून येते.

आपल्या ३२ वर्षाच्या कॉम्पुटर क्षेत्रामधील कारकिर्दीत २० वर्षे त्यांनी पटनी, L&T आणि सिंटेल सारख्या कंपन्यांचे उच्चपद भूषविले...त्यांची काही पुस्तके आज अनेक देशामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरतात ...अनेक इतर विषयावरील त्यांची पुस्तके लोकप्रिय आहेत. संगीत, शास्त्र, व्यवस्थापन, मानसशास्त्र अशा सगळ्या विषयात ते लीलया  विहार करताना आढळतात.

इतके पैलू असलेल्या या अजब मुसाफिराला माझा मनापासून नमस्कार.

Sunday, March 17, 2013

असेच काहीसे... २

चालणे...

एकट्याने चालणे हल्ली आवडायला लागले आहे...
स्वताशी बोलताना प्रामाणिक व्हायला जमायला लागले आहे...
थोडक्यात काय ... "चालू"पणा सोडायला यायला लागले आहे...
 

चिमण्या...

पहाटेचा चिमण्यांचा चिवचिवाट म्हणजे खरे जीवन...
नंतर दिवस उजाडल्यावर असतो तो फक्त  गिधाडांचा धुमाकूळ...
चिमण्या पाखरांनी जगायचे तरी कसे?


माझ्या कविता...

आजकाल फारच कविता सुचायला लागतात...
बसल्या बसल्या मनपाखरे हवेत उडायला लागतात..
मित्र म्हणतात "डॉक्टर काय म्हणाले? काळजी घेत जा..."


पार्टटाईम समाजसेवा...

स्वताभोवती कुंपण टाकून जगायची सवय लागली आहे आम्हाला..
वीकेंड ला समाजसेवा "status symbol" म्हणून करणारी माणसे आम्ही..
बाबा आमटे, अभय बंग, वाचले पण उमगले नाही कधी....


 

Sunday, March 10, 2013

असेच काहीसे...


अंधार

अंधार दाटलेला...माझ्या मनात...
पौर्णिमा असून पण मनीचा चंद्र...
कायम झाकोळलेला.....

 

अभ्यास

मुलांचा अभ्यास घेता घेता....
मी लहान झालो...
वाटले लहान असताना कोणी हवे होते माझापण असा अभ्यास घेणारे...


सायंकाळ

दिवस रिटायर व्हायला आलेला...
सूर्यानेपण हात टेकले...
सायंकाळ आली पेन्शन बनून  ... एवढेच काय ते सुख...


आरसा

ती आरशात पाहताना...
वाटते आरसा बनावे...
आणि खरे खरे मत, न घाबरता मांडावे...

देव, दुष्काळ आणि नवस...


देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

देवा काय मागू हेच कळत नाही...तुला द्यायला जमेल का नाही हे पण वळत नाही...
तरी पण....
देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

देवा, सर्वाना खायला अन्न नाही पण प्यायला पाणी तरी देशील का...देवा पाण्यावाचून मरून जाण्यार्या माझ्या लोकांना जीवन देशील का...
देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

देवा आम्ही शहरामध्ये राहतो, प्रत्येकाच्या घरात स्वतंत्र नळ आहे...
पाण्याची किंमत आम्हाला कदाचित कळत नाही....कारण आमच्या नळाचे पाणी कधी सरत नाही...
देवा आम्हाला पाण्याची किंमत समजावून सांगशील का...  पाण्यावाचून मरून जाण्यार्या माझ्या लोकांना जीवन देशील का...
देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

देवा, कधी स्वर्गामध्ये दुष्काळ पडतो का रे...पाण्यासाठी भांडणे होतात का रे...
देवा पण एक नक्की सांगतो...पाण्याशिवाय काही लोकांना जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागतात रे....
देवा आता तरी आम्हाला पावशील का...थोडे का होईना पण तहानलेल्या माझ्या लोकांना पाणी पाजशील का....
देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....